नेहमीप्रमाणे बँकेत आलेल्या कर्मचाऱ्यांनी सुट्ट्या संपल्यानंतर आलेल्या एका खास ‘पाहुण्याला’ पाहून धक्का बसला. जीवाच्या भीतीने घाबरलेल्या या कर्मचाऱ्यांनी काय केले, याचा हा वृत्तांत.

बेळगाव तालुक्यातील हलगा येथील ‘बँक ऑफ इंडिया’च्या शाखेत रविवारची सुट्टी संपवून सोमवारी कर्मचारी आले. त्यावेळी ही थरारक घटना घडली. वॉशरूममध्ये गेलेल्या एका कर्मचाऱ्याने बाहेर येताच, फणा काढलेल्या नागाला समोर पाहिले. घाबरून तो ओरडू लागला आणि नाग फणा काढून बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्यांच्या मध्ये लपला. नागपंचमी संपल्यानंतर आलेल्या या नागाला पाहून कुणालाच काय करावे, हे सुचत नव्हते.
त्यानंतर एका कर्मचाऱ्याने बस्तवाड येथील सर्पमित्र रामा पाटील यांना याची माहिती दिली. रामा पाटील तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या नागाला सुरक्षितपणे पकडले. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सर्पमित्र रामा पाटील यांच्या मते, हा चार वर्षांचा विषारी नाग असून त्याला पकडून सुरक्षितपणे जंगलात सोडले जाईल. ‘सापांना मारू नका, साप दिसल्यास सर्पमित्रांशी संपर्क साधा,’ असे आवाहनही त्यांनी केले.


Recent Comments