Belagavi

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापनदिन उत्साहात

Share

प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता सोपी झाली आहे, पण पत्रकारांवरील जबाबदारी आणखी वाढली आहे, असे मत कोल्हापूर जिल्हा माहिती विभागाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी व्यक्त केले.

बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा ४८ वा वर्धापनदिन रविवारी पेठ येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रवीण टाके यांच्यासोबत पुणे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर देशपांडे आणि कोल्हापूर विभागीय माहिती विभागाचे उपसंपादक रणजित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी बोलताना प्रवीण टाके म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता सोपी झाली आहे, पण पत्रकारांवरील जबाबदारी वाढली आहे. आजच्या पिढीतील पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञान शिकणे आवश्यक आहे. भविष्यात पत्रकारांनी जबाबदारीने काम करणे महत्त्वाचे आहे.”

समीर देशपांडे म्हणाले की, “कोल्हापूरमधील पत्रकार सीमाभागातील मराठी लोकांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवत आले आहेत. सीमाभागातील जनतेला आणि पत्रकारांना येणाऱ्या अडचणींची आम्हाला जाणीव आहे. बेळगावमध्ये पत्रकारिता करणे खूप आव्हानात्मक आहे. कोविडनंतर माध्यमांची आर्थिक स्थिती अधिकच कमकुवत झाली असून, पत्रकारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.”

रणजित पवार यांनी महाराष्ट्राच्या सरकारने पत्रकारांसाठी जाहीर केलेल्या योजनांची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाला पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, शेखर पाटील, सुहास हुद्दार, माजी महापौर मालोजी अष्टेकर, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, जनसंपर्क अधिकारी विकास कलघटगी यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.

Tags: