Belagavi

राज्यातील युरिया तुटवड्यावर भाजप खासदारांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत भेट

Share

केंद्रीय रासायनिक आणि खत मंत्री जे.पी. नड्डा यांची कर्नाटक भाजपच्या खासदारांच्या शिष्टमंडळासह राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यातील रासायनिक खतांच्या वितरणातील गोंधळावर मंत्र्यांशी चर्चा केली.

नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन खासदार ईरन्ना कडाडी यांनी माहिती दिली की, खरीप हंगामासाठी कर्नाटक राज्याने ६.३० लाख मेट्रिक टन युरियाची मागणी केली होती. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्रीय खत विभागाने जुलै अखेरपर्यंत ८.७३ लाख मेट्रिक टन खताचा पुरवठा केला आहे. राज्यात आतापर्यंत ७.०८ लाख मेट्रिक टन युरियाची विक्री झाली आहे. १.६५ लाख मेट्रिक टन युरिया राज्याच्या गोदामांमध्ये अजूनही साठलेला आहे, अशी माहिती मिळाली. याशिवाय, सुमारे १६ हजार टन खत राज्याला पाठवले जात आहे, असेही मंत्र्यांनी आमच्या शिष्टमंडळाला सांगितले, असे कडडी म्हणाले.

कर्नाटक राज्यातील कलबुर्गी, कोप्पळ, शिवमोग्गासह काही जिल्ह्यांमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकारने आपल्याकडील १.६५ लाख मेट्रिक टन खताचे योग्य वितरण करून परिस्थिती हाताळावी, असे त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पटवून दिले.

राज्यातील काँग्रेस सरकारमध्ये सत्ता वाटणीवरून सुरू असलेल्या वादामुळे खत वितरणासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात ते अपयशी ठरले आहेत. खुल्या बाजारात एजंट युरिया खताचा गैरवापर करत आहेत. अशा लोकांना संधी देऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर आणणे आणि केंद्राकडे बोट दाखवणे किती योग्य आहे? शेतकऱ्यांच्या खताच्या बाबतीत राजकारण न करता, योग्य वितरणासाठी पावले उचलून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणे आवश्यक आहे.  या शिष्टमंडळात केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा, खासदार जगदीश शेट्टर, विश्वेश्वर हेगडे कागेरी, पी.सी. गद्दगौडर, रमेश जिगजिणगी, डॉ. के. सुधाकर, कॅप्टन ब्रिजेश चौटा उपस्थित होते.

Tags: