Belagavi

बेळगावात गांजा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई

Share

बेळगाव पोलिसांनी अवैध गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांवर धडक कारवाई करत, तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

२६ जुलै २०२५ रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील राकसकोप्पा गावाजवळच्या डॅमजवळ, बिजागरणी गावाकडे जाणाऱ्या कॉर्नरजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवाई आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात ओमकार कल्लाप्पा बेळगावकर (२५, लक्ष्मी गल्ली, हंगरगा, बेळगाव शहर) आणि वैष्णव परशुराम भक्तिकर (२३, तुरमुरी, बेळगाव शहर) या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २५,००० रुपये किमतीचा १.२६० किलो गांजा, २०,००० रुपये आणि ६,००० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, अंदाजे ३०,००० रुपये किमतीची स्कुटर आणि १,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८२,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

२६ जुलै २०२५ रोजी काकती पोलीस ठाण्याचे पीएसआय मृत्युंजय मठद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हद्दीत गस्त घालत असताना, अखिल श्याम मेत्री (२९, आंबेडकर गल्ली, काकती, बेळगाव) याला भारत नगरजवळ सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करताना पकडले. आरोपीविरुद्ध काकती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६३/२०२५, कलम २७(B) एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १.२६० किलो गांजा (किंमत २५,००० रुपये), दोन मोबाईल फोन (किंमत २६,००० रुपये), एक स्कुटर (किंमत ३०,००० रुपये) आणि १,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण ८२,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई केल्याबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी संबंधित पोलीस ठाण्यांचे पीएसआय आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Tags: