Belagavi

बेळगावमध्ये राज्यस्तरीय जूडो स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Share

राज्यस्तरीय जूडो अजिंक्यपद स्पर्धेचे आज बेळगाव येथील गांधी भवन येथे शानदार उद्घाटन करण्यात आले. पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आणि बॉडी बिल्डर सुनील आपटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात झाली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली, तसेच जूडो कलेवर आधारित एका सुंदर नृत्यनाटिकेचेही यावेळी सादरीकरण करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातून ५०० हून अधिक स्पर्धक, पंच आणि प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. आयोजकांनी खेळाडूंसाठी मोफत निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना डीसीपी नारायण बरमणी यांनी स्पर्धकांना उद्देशून शिस्त, समर्पण आणि चिकाटीचे महत्त्व अधोरेखित केले. ही स्पर्धा रविवारी संपन्न होईल आणि त्यानंतर विजेत्यांचा गौरव करण्यात येईल. शक्ती, कौशल्य आणि क्रीडासंस्कृतीचा उत्सव ठरणारी ही स्पर्धा बेळगावला जूडो आणि मार्शल आर्ट्सच्या क्षेत्रात पुन्हा एकदा अग्रस्थानी घेऊन आली आहे.

बेळगाव ॲमॅच्युअर जूडो असोसिएशनच्या पुढाकाराने आणि अध्यक्ष डॉ. सोनाली सरनोबत व उपाध्यक्ष डॉ. प्रकाश मुगळी यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या आयोजनात राज्य जूडो संघटनेचे अध्यक्ष आनंद आणि सचिव रविकुमार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

कार्यक्रमाला उपाध्यक्ष बसवराज कडली आणि लक्ष्मण अडिहुडी, सहसचिव अॅड. पूजा गवाडे, खजिनदार प्रमोद सुर्यवंशी, कार्यकारी सदस्य श्री. संतोष कांग्राळकर, तांत्रिक समितीच्या कु. भैरवी मुजुमदार, प्रशिक्षक व समन्वयक कु. रोहिणी पाटील, तसेच प्रशिक्षक त्रिवेणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: