बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना राबवण्यात येत असून, त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे. बेळगाव ग्रामीणमधील उचगाव येथे पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभाग, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आर.आय.डी.एफ.-३० योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

सुमारे ५० लाख रुपये खर्चून हे पशुवैद्यकीय रुग्णालय उभारले जाणार आहे. पशुधन संगोपनाला चालना देण्यासाठी आपल्या सरकारने अनेक योजना आणल्या आहेत. पशुवैद्यकीय विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या माध्यमातून या योजनांची अंमलबजावणी होत असून, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या या योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, हाच आपला उद्देश असल्याचे मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.
ग्रामीण भागात शासनाच्या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. गेल्या ७ वर्षांपासून येथील लोकांना विकासाचा अर्थ समजू लागला आहे. पूर्वी कोणतीही योजना लोकांपर्यंत पोहोचत नव्हती, असेही त्यांनी नमूद केले. याचवेळी, पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागामार्फत आयोजित पशुसखींच्या कुक्कुट संजीवनी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण आणि गणवेश वाटप समारंभात त्यांनी भाग घेतला. यावेळी गणवेश, दुधाचे कॅन, पिशव्या आणि प्रमाणपत्रासारख्या सुविधांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. रवी साळिगोडार, युवराज कदम, युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर, शंकरगौडा पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे, ग्रामपंचायत सदस्य आणि पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments