महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या सांगण्यावरून महानगरपालिकेत कन्नडविरोधी किंवा कन्नडचा अपमान करणाऱ्या कोणत्याही हालचाली घडल्यास, क.र.वे.चे कार्यकर्ते पालिकेला घेराव घालून त्यांना धडा शिकवतील, असा कर्नाटक रक्षण वेदिके (नारायणगौडा गट) ने इशारा दिला आहे.

गुरुवारी, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांची भेट घेतली. बेळगाव शहरात सरकारच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रांमध्ये कन्नडची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे आणि हे कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. म.ए.समितीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन कन्नड फलक हटवण्याची मागणी करत दादागिरी केली होती. कोणत्याही परिस्थितीत म.ए.समितीच्या अरेरावीला घाबरून न जाता, बेळगाव पालिकेत कन्नडची सक्ती कायम ठेवावी, असे क.र.वे.ने स्पष्ट केले.
क.र.वे.चे राज्य संयोजक राजू नाशीपुडी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन कन्नड फलक हटवण्याची मागणी करत दादागिरी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी म.ए.समितीच्या या अरेरावीला घाबरून न जाता कन्नडची सक्ती करावी.” नाशीपुडी यांनी पुढे इशारा दिला की, जर महानगरपालिकेत कन्नडविरोधी कारवाई झाली, तर बेळगाव महानगरपालिका सुपरसीड (बरखास्त) करावी अशी मागणी सरकारकडे केली जाईल.
महापौर मंगेश पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, काही खाजगी लोक जाहिराती लावतात. या संदर्भात आयुक्तांशी बोलणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी सुरेश गवण्णवर, गणेश रोकडे, मंजुनाथ राठोड, रमेश यरगण्णवर, विनायक भोवी, लोकेश राठोड यांच्यासह क.र.वे.चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments