Belagavi

सीमाभागातील कन्नड सक्तीविरोधात म. ए. समिती आक्रमक

Share

बेळगाव आणि सीमाभागात प्रशासनाकडून वाढवण्यात येत असलेल्या कन्नड सक्तीविरोधात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले असून, भाषिक हक्कांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे दाद मागण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मराठा मंदिर येथे तालुका समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत उपरोक्त निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मनोहर किणेकर म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून बेळगावात प्रशासन कन्नड सक्तीचे वातावरण निर्माण करत आहे. महानगरपालिकेत इंग्रजी आणि मराठी भाषेतील फलक काढून कन्नड फलक लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, कर्नाटकात अल्पसंख्याक असले तरी बेळगाव जिल्ह्यात १५ टक्क्यांपेक्षा अधिक मराठी भाषिक असल्याने, भाषिक हक्कांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात २० जुलै नंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन कन्नडप्रमाणेच मराठी भाषेत देखील व्यवहारासाठी निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या कामकाजासंदर्भात लवकरात लवकर कोल्हापूर येथे तज्ज्ञ समितीच्या सदस्यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. याचप्रमाणे, कन्नड सक्तीविरोधात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोर्चा काढण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला असून, या अनुषंगाने घटक समितीच्या बैठका घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयातील याचिकेप्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी महापौर आणि म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी सांगितले की, मराठी भाषिकांच्या हितासाठी काही गोष्टी गोपनीय ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून कर्नाटक सरकार सावध होणार नाही. त्यांनी स्पष्ट केले की, समिती कशी काम करत आहे, हे सार्वजनिक करण्याची गरज नाही, कारण काही बाबतीत गुप्तता पाळणे आवश्यक असते. कन्नड सक्तीविरोधात काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी घटक समित्यांच्या बैठका घेऊन पुढील आखणी केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

यावेळी शहर म. ए. समिती कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, खजिनदार प्रकाश मरगाळे ऍड. राजाभाऊ पाटील, गोपाळराव देसाई, गोपाळ पाटील, आर. एम. चौगुले, मुरलीधर पाटील, विलास बेळगावकर, एम. जी. पाटील, जयराम देसाई आदींसह समितीचे विविध नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: