बेळगाव उपनिबंधक कार्यालयात एका लिपिकाचा मुलगा बेकायदेशीरपणे कामकाज करत असल्याचा धक्कादायक प्रकार बेळगावात समोर आला आहे. त्याने थेट अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसून लाॅगिनचा गैरवापर केल्याचा आरोप पुढे आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बेळगाव उत्तर उपनिबंधक कार्यालयात हा प्रकार उघडकीस आला. राजशेखर अळगोडे नावाचा हा युवक कार्यालयातील लिपिकाचा मुलगा असून, तो येथे अनधिकृतपणे काम करत होता. उपनिबंधक कार्यालयात नसतानाही तो स्वतः लाॅगिन वापरून कामे करत असल्याचे निदर्शनास आले. माध्यमांचे प्रतिनिधी कार्यालयात पोहोचले असता, राजशेखर अळगोडे हा चक्क उपनिबंधकाच्या खुर्चीवर बसून काम करत होता.

या प्रकारानंतर उपनिबंधक करिबसनगौडा अचानक समोर आले आणि त्यांनी माध्यमांसमोर उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. वडिलांच्या वयोमानामुळे मुलगा मदतीला येतो असे सांगत, तो आपल्या खुर्चीवर बसल्याचे माहीत नसल्याची सारवासारव त्यांनी केली.
या घटनेवर जिल्हा निबंधक महांतेश यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

लिपिकाच्या मुलावर आणि उपनिबंधकांवर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेमुळे सरकारी कार्यालयांमध्ये अनाधिकृत व्यक्तींच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Recent Comments