बेळगाव शहरात झेप्टो कंपनीमध्ये डिलिव्हरी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी, विशेषतः जीवन विमा आणि इतर सुविधांसाठी, एआययूटीयूसी संघटनेच्या नेतृत्वाखाली युनायटेड फूड डिलिव्हरी पार्टनर युनियनच्या सदस्यांनी कामगार विभागाकडे निवेदन सादर करत जोरदार निदर्शने केली.

बेळगाव शहरात झेप्टो कंपनीत सुमारे ७०० हून अधिक कर्मचारी डिलिव्हरी बेसवर काम करत आहेत. मात्र, त्यांना कंपनीकडून जीवन विमासह इतर आवश्यक सुविधा मिळालेल्या नाहीत. अनेक वेळा कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करूनही कोणताही फायदा झाला नाही, अशी नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली.
कामगार नेते आणि वकील म्हणाले, की कंपन्या आकर्षक ऑफर देऊन कर्मचाऱ्यांना कामावर घेतात, पण नंतर ‘रेट कार्ड’ कमी करून कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी करतात. या संदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी अनेक वेळा बोललो आहोत, पण त्यांनी ‘तुमची आयडी ब्लॉक करू आणि आठवड्यानंतर कामावरून काढून टाकू’ अशी धमकी दिली आहे. कंपन्यांना मोठ्या स्तरावर वाढायचे असेल, तर त्यांनी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी जीवन विमासह इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
याबाबत कामगार विभागाचे अधिकारी मल्लिकार्जुन गोदी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, एआययूटीयूसी संघटनेच्या नेतृत्वाखाली युनायटेड फूड डिलिव्हरी पार्टनर युनियनच्या सदस्यांनी विभागाकडे निवेदन सादर केले आहे. आम्ही कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावून सामोपचाराने मार्ग काढण्याचा प्रयत्न करू आणि न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करू. देशभरात कर्नाटकमध्ये कामगार विभाग २०२४ पासून, काम करताना अपघात झाल्यास, नोंदणीकृत कर्मचाऱ्यांसाठी मोफत जीवन विमा देत आहे. युनायटेड फूड डिलिव्हरी पार्टनर युनियनच्या सदस्यांची नोंदणी करून त्यांना आर्थिक आणि सामाजिक सुविधा देण्याचे काम हाती घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.


Recent Comments