Belagavi

बेळगावात ‘फोर्टी वनर्स क्लब’चा पदग्रहण सोहळा उत्साहात

Share

बेळगाव मध्ये फोर्टी वनर्स क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. समाजाच्या भल्यासाठी कार्यरत असलेल्या या क्लबचा नवा अध्याय या सोहळ्याने सुरू झाला.

बेळगाव येथील फोर्टी वनर्स क्लब आणि बेळगाव चॅलेंजर्स टँजेंट-३८ क्लब हे रक्तदान शिबिरे, शाळांना मूलभूत सुविधांचे वाटप, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि आरोग्य तपासण्या यांसारख्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय आहेत. याच फोर्टी वनर्स क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण कार्यक्रम बुधवारी बेळगाव येथे पार पडला. या सोहळ्याला फोर्टी वनर्सचे व्यवस्थापक दिलीप चांडक प्रमुख अतिथी म्हणून, तर राऊंड टेबल एरियाचे चेअरमन सुदर्शन जाधव आणि लेडीज सर्कलच्या श्रेया सुंठणकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी मनोज तलरेजा यांनी अध्यक्षपदाची, देवेंद्रसिंग खुराणा यांनी उपाध्यक्षपदाची, अमित भाटिया यांनी सचिवपदाची, तर विनायक मंगळवाडे यांनी खजिनदारपदाची सूत्रे स्वीकारली. त्याचबरोबर, टँजेंटच्या अध्यक्षपदी रेश्मा तलरेजा, उपाध्यक्षपदी रूपा काटवा, सचिवपदी पूनम गुलबानी, आणि खजिनदारपदी सविता मैत्राणी यांनी पदभार स्वीकारला.

मावळते अध्यक्ष नागेश छाब्रिया आणि संगिता चांडक यांनी नवीन अध्यक्षांकडे पदाची सूत्रे सोपवली. प्रमुख अतिथी फोर्टी वनर्सचे व्यवस्थापक दिलीप चांडक यांनी सांगितले की, फोर्टी वनर्स क्लब हा एक सहयोगी क्लब असून, तो विविध अर्थपूर्ण उपक्रम राबवतो. राणीबेन्नूर येथील शाळेच्या विकासासाठीही आर्थिक मदत करण्यात आली आहे. अनेक सदस्यांनी क्लबच्या कार्यात सहभाग घेतला असून, यापुढेही आणखी चांगले उपक्रम राबवले जातील.

लेडीज सर्कलच्या श्रेया सुंठणकर यांनी माहिती दिली की, फोर्टी वनर्स क्लबने यावर्षीही अनेक योजना आखल्या आहेत आणि त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.

राऊंड टेबल एरियाचे चेअरमन सुदर्शन जाधव यांनी सांगितले की, लहानपणापासूनच मुली समाज घडवण्यासाठी किती सक्रिय असतात, हे आपण पाहिले आहे. गेल्या चार वर्षांत फोर्टी वनर्स क्लबने वेगाने प्रगती केली आहे. मागील वर्षी ‘दृश्यम एआय’ प्रकल्पाद्वारे दृष्टिहीनांना दृष्टी देण्याचे कार्य करण्यात आले होते. यावर्षीही अनेक नवीन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

नूतन अध्यक्ष मनोज तलरेजा म्हणाले की, फोर्टी वनर्स क्लबने अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. क्लब आता एआय युगात ‘अपग्रेड’ होत आहे, ही आनंदाची बाब आहे. एक उत्तम आणि सक्रिय भारत घडवण्यासाठी क्लबच्या उद्दिष्टांची जाणीव ठेवून सर्वांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी फोर्टी वनर्स क्लब आणि बेळगाव चॅलेंजर्स टँजेंट-३८ क्लबचे सदस्य तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: