बेळगावातील चौथ्या रेल्वे गेटजवळ झालेल्या हायव्होल्टेजमुळे विद्युत उपकरणे आणि दिवे जळून खाक झाले आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठे नुकसान झाले असून, ते हेस्कॉमवर तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

बेळगावातील चौथ्या रेल्वे गेटजवळील अनागोळ बांबले गल्ली आणि परिसरातील घरांमध्ये रविवारी सकाळी हायव्होल्टेजमुळे शॉर्ट सर्किट झाले. यामुळे येथील नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत. हेस्कॉमच्या या कारभाराबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

विजेच्या सततच्या लपंडावानंतर अचानक आलेल्या हायव्होल्टेजमुळे घरातील दिवे जळाल्याने आणि रविवारपासून वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. हेस्कॉमला माहिती देऊनही त्यांनी तात्काळ दुरुस्ती केली नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. बिल न भरल्यास लगेच वीज कनेक्शन तोडणारे हेस्कॉम, अशा गंभीर परिस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना करत नसल्याबद्दल नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
या हायव्होल्टेजमुळे येथील व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसला आहे. येथील एका डेअरीतील कॅमेरे आणि दिवेही जळाले आहेत. तसेच, वीजपुरवठा खंडित झाल्याने त्यांचे उत्पादनही खराब झाले आहे. सुमारे १५० लिटर दूध नासले असून याचा मोठा फटका बसल्याचे डेअरीचे संचालक सुनील अनागोळकर यांनी सांगितले. हेस्कॉमने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.


Recent Comments