बेळगावातील कांदा मार्केट परिसरात आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सुमारे दोन दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली आहेत. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे पाच तासांनी आगीवर नियंत्रण मिळवता आले.

कांदा मार्केट परिसरात पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. ही आग सुरुवातीला एका स्टेशनरी दुकानाला आणि प्लास्टिकच्या वस्तू विकणाऱ्या दुकानाला लागली. आगीची माहिती मिळताच, तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.

आगीची तीव्रता वाढत असल्याचे पाहून, बाजूला असलेल्या पेंटच्या दुकानाचे आणि फटाक्यांच्या दुकानाचे मालक भयभीत झाले होते. अग्निशमन दलाच्या शिबाजीराव कुरवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण १० अग्निशमन वाहनांचा वापर करण्यात आला. सुमारे ४ ते ५ तास चाललेल्या या ऑपरेशननंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.

आगीत प्लास्टिकच्या वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. या आगीत अंदाजे २५ लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले असावे अशी शक्यता कुरवे यांनी व्यक्त केली. घटनास्थळी वाहतूक एसीपी जे. आर. निक्कम यांनी भेट देऊन आग विझवण्याच्या कामात सहकार्य केले. मार्केट परिसरात आग लागल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची नोंद बेळगाव मार्केट पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


Recent Comments