हिंडलगा ग्रामपंचायत व्याप्तीत येणाऱ्या लक्ष्मीनगर येथील श्री महालक्ष्मी समाज मंदिराचा ३३ वा वर्धापनदिन आणि यात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पालखी पूजनाने झाली. त्यानंतर संपूर्ण गावभर पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीसमोर टाळांच्या गजरात भजनी महिला मंडळाने ठेका धरत भजन सादर केले. पंढरपूरच्या वारीचे सुंदर दृश्य साकारत बालचमू विठुरायाच्या वेशभूषेत या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते, ज्यामुळे सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली होती.
मंदिरापासून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली पालखी मिरवणूक संपूर्ण गावभर फिरून पुन्हा मंदिराकडे परतली. मंदिरासमोर कुंकुमार्चन विधी उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला बेंगळुरू गोसावी मठाचे मंजुनाथ भारती स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. वाजत गाजत स्वामींचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना मंजुनाथ भारती स्वामींनी मातृप्रेम, मातृभक्ती, भक्ती, सनातन धर्म, स्त्रीशक्ती आणि संस्कार यावर विचार व्यक्त करत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने स्वामींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मंदिर समितीचे अध्यक्ष दत्ताजीराव कानूरकर म्हणाले, गेल्या ३३ वर्षांपासून लक्ष्मीनगर येथील लक्ष्मी मंदिरात दरवर्षी वर्धापनदिन साजरा केला जातो. या मंदिराच्या माध्यमातून अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले जात असून येथील यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही पद्धतीचा पशुबळी न देता विधिवत पूजा अर्चा करून दरवर्षी यात्रा साजरी केली जाते.
वर्धापनदिन यात्रोत्सवानिमित्त मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. सालाबादप्रमाणे यंदाही देवीची विशेष आकर्षक आरास सौ. लक्ष्मी कानूरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. मंजुनाथ भारती स्वामींच्या अधिष्ठानाखाली महाआरती संपन्न झाली. भर पावसातही पालखी सोहळ्यात अबालवृद्ध आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता. महाआरती नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिन आणि यात्रेचे औचित्य साधून दहावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मंजुनाथ भारती स्वामींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष दत्ताजीराव कानूरकर, उपाध्यक्ष कृष्णा बाडीवाले, सदस्य प्राजक्त केंकरे, सुरेश पाटील, राजन टाकळकर, शिवाजी बाडीवाले, दिनकर गवस, किशोर उरणकर, जगदीश पाटील, सच्चीदानंद चिक्कोर्डे, शिवसंत संजय मोरे, पत्रकार रवी पाटील आदी मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments