बेळगावची पहिली केबल नेटवर्क कंपनी आणि लोकांच्या प्रेम व विश्वासाने यशाच्या शिखरावर पोहोचलेली रिद्धी व्हिजन अर्थात मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, जीटीपीएलचा ३० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
रिद्धी व्हिजन अर्थात मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, जीटीपीएलचे संचालक नागेश छाब्रिया आणि एम.डी. अनिरुद्धसिंह जडेजा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्तरचे आमदार आसिफ सेठ, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने दिवंगत निशा छाब्रिया यांनी लोकांशी साधलेला संवाद उपस्थितांची मने जिंकून गेला.
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, सुरुवातीला या व्यवसायात भाग घेण्यास संकोच वाटत होता, पण नागेश छाब्रिया आणि हरीश गुलबानी यांनी विश्वास दाखवला. त्यानंतर हा केवळ व्यवसाय नसून, नेटवर्क तयार करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे समजले. नागेश छाब्रिया यांनी सुरू केलेला हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. भारताची अर्थव्यवस्था जगातील ५ व्या क्रमांकावर असून, जपानशी स्पर्धा करण्यास सज्ज आहे. २०२७ पर्यंत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. विकसित भारतात प्रत्येक भारतीयाने सहभागी झाले पाहिजे.

महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, रिद्धी व्हिजनच्या संचालिका निशा छाब्रिया यांनी पाहिलेले स्वप्न त्यांची मुले पूर्ण करत आहेत. कोणतीही संस्था सुरू करण्यासाठी मोठी स्वप्ने पाहिली जातात. अनेक चढ-उतारानंतर मिळवलेले यश पाहून समाधान वाटते. केबल नेटवर्कमध्ये किंग असलेल्या जडेजा यांच्यासोबत बेळगावीचे उद्योजक छाब्रिया काम करत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. म्हैसूर आणि हुणसूरच्या लोकांची मने बेळगावीकरांनी जिंकली आहेत, याचा आनंद आहे.
विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी म्हणाले की, संस्था किंवा व्यवसाय केवळ नफ्यासाठी नसतात. त्या चालवण्यासाठी नफा आणि तोटा समान मानला पाहिजे. सुख-दुःख जीवनाला शिकवण देतात आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात. रिद्धी व्हिजनला एक परिवार मानून सेवा केल्यामुळेच संस्थेला यश मिळाले आहे. निशा आणि नागेश छाब्रिया सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी संस्था वाढवण्यासोबतच अनेकांच्या जीवनाला आधार दिला आहे. बेळगावीत त्यांनी केलेल्या कामाचा अभिमान वाटतो.

बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ म्हणाले की, छाब्रिया कुटुंबासोबत आमचे नाते खूप जुने आहे. नागेश छाब्रिया इतक्या उच्च स्तरावर पोहोचले, यात त्यांच्या पत्नी निशा छाब्रिया यांचे मोठे योगदान आहे. निशा छाब्रिया यांचे व्यक्तिमत्व खूप छान होते. त्या आज आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी नेहमी लोकांच्या मनात ताज्या राहतील.
रिद्धी व्हिजन मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड, जीटीपीएलचे संचालक नागेश छाब्रिया म्हणाले की, आमच्या कंपनीत २५०० केबल ऑपरेटर्स आहेत आणि कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम बंगालमध्ये सुमारे १० लाख ग्राहक आहेत. ३० वर्षांचा हा प्रवास सुख-दुःखाचा होता. पत्नी दिवंगत निशा छाब्रिया यांनीही खांद्याला खांदा लावून संस्थेला पुढे नेले. आमची कंपनी आता जीटीपीएलसोबत हाय डेफिनिशन, विविध कॉम्बो ऑफर्स, ओटीटी, आयपीटीव्हीसह पुढे जात आहे. आमच्या केबल चॅनेलवर इन न्यूजसह स्थानिक वृत्तवाहिन्यांचे प्रक्षेपण, उत्सवांचे थेट प्रक्षेपण आणि प्रादेशिक प्रक्षेपण पाहता येतात. ग्राहकांना दिलेली विश्वासार्ह सेवा हीच आमच्या यशाचा पाया आहे.
यानंतर मेट्रोकास्ट प्रायव्हेट इंडिया लिमिटेड (रिद्धी व्हिजन) जीटीपीएलसाठी उत्तम सेवा देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी आदित्य अस्रानी, रिद्धी अस्रानी, सुमुख छाब्रिया, संजना छाब्रिया, हरीश गुलबानी, आदर्श गुलबानी, रवी पाटील, इन न्यूजचे समूह संपादक राजशेखर पाटील, संतोष पर्वतराव, शशिधर कोटे, श्रीश पट्टणशेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर, केबल ऑपरेटर्स, ब्रॉडकास्टर्स आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments