Belagavi

कर्नाटक वन केंद्रांना आम. असिफ सेठ यांची अचानक भेट!

Share

बेळगाव उत्तरचे आमदार आसीफ सेठ यांनी ई-खात्यासाठी एजंटगिरी करून जास्त पैसे घेणाऱ्या आणि एजंटमार्फत अर्ज स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अशा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ई-खात्याच्या कामासाठी कर्नाटक वन केंद्रांमध्ये एजंटांचा बोलबाला असून, ते लोकांकडून जास्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार आसीफ सेठ आणि नगरसेवकांनी आज बेळगावातील अशोकनगर येथील कर्नाटक वन केंद्राला अचानक भेट देऊन पाहणी केली.

‘अ’ आणि ‘ब’ खात्यांसाठी सरकारी शुल्क केवळ २५ रुपये असताना, मध्यस्थ लोकांकडून जास्त पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी थेट महानगरपालिका आयुक्त, उपायुक्त किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. कोणत्याही मध्यस्थाला यात स्थान नाही. एजंटांमार्फत अर्ज स्वीकारल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदारांनी दिला.

महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते मुजम्मिल ढोणी म्हणाले की, ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ खात्यांसंदर्भात लोकांकडून जास्त पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. केवळ मध्यस्थांमार्फत गेल्यासच काम होते, असे बोलले जात आहे. जर कोणी २५ रुपयांपेक्षा जास्त पैशांची मागणी करत असेल, तर त्वरित लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.

या पाहणी दौऱ्यात महानगरपालिकेचे सदस्य, आयुक्त आणि इतर अधिकारी सहभागी झाले होते.

Tags: