बेळगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या २०२५-२०२८ या वर्षांसाठी नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव बाडगंडी यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा आज उत्साहात पार पडला.

बेळगावमधील एका खाजगी हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. या सोहळ्याला कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एस. एन. प्रसाद उपस्थित होते. त्यांनी नूतन अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीला अधिकारपदाची सूत्रे सोपवली. तसेच, केएसटीपीएचे सचिव मुकुंद पोतनीस, बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजू कत्तिशेट्टी आणि बीसीसीआयचे सचिव राजेंद्र मुतगेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना एस. एन. प्रसाद म्हणाले की, कर सल्लागारांची भूमिका महत्त्वाची आहे आणि संस्थेची नवीन टीम प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने काम करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुकुंद पोतनीस यांनी संस्थेच्या पुढील कार्यायोजनांविषयी आपले विचार मांडले. संजू कत्तिशेट्टी आणि राजेंद्र मुतगेकर यांनी बेळगावच्या आर्थिक विकासात कर सल्लागारांच्या योगदानाला गौरवले.
नूतन अध्यक्ष संजीव बाडगंडी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, संस्थेच्या सदस्यांच्या हिताचे रक्षण करणे आणि कर संबंधित विषयांवर जनतेला योग्य माहिती देणे हे आपले प्राधान्य असेल. त्यांनी आपल्या टीममधील सदस्य टी. एन. माळगे, विक्रम कोकाने, सचिन कुलकर्णी, शशी बाडकर आणि सोमशेखर सुतार तसेच बीटीपीएच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानले आणि सर्वांच्या सहकार्याने संस्थेला अधिक उंचीवर नेण्याचा विश्वास व्यक्त केला.

टी. एन. माळगे, विक्रम कोकाने, सचिन कुलकर्णी, शशी बाडकर आणि सोमशेखर सुतार यांच्या नेतृत्वाखालील स्वागत समितीने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले होते. या समारंभाला बेळगावातील अनेक कर सल्लागार आणि मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments