शासकीय विविध योजनांच्या अंतर्गत बेळगावच्या कणबर्गी भागात बेरोजगार युवक व युवतींना एक महिन्यांचे मोफत स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात येत आहे. कॅनरा बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) मार्फत ही योजना राबविण्यात येत असून प्रशिक्षणार्थींना उद्योगक्षेत्रात सक्षम करण्याचा उद्देश या मागे आहे.

या प्रशिक्षणात युवतींसाठी शिवणकाम, भरतकाम, कशिदा (कसोटी), आरी वर्क व इतर कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे, तर युवकांसाठी मोटार वाइंडिंग, लघुउद्योग यासारख्या क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जात आहे. सरकारने बेरोजगारी कमी करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या असल्या तरी त्याबाबत जागरूकता अभावामुळे अनेकांना या संधींपासून वंचित राहावे लागत आहे. मात्र, कणबर्गी परिसरात अनेक तरुण-तरुणींनी या प्रशिक्षणाद्वारे कौशल्य आत्मसात करून व्यवसाय सुरू केला आहे.
प्रशिक्षण घेणाऱ्या लक्ष्मी हिरेमठ या प्रशिक्षणार्थिनीने आपल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटले की, ही संधी माझ्यासारख्या अनेक महिलांसाठी आशेचा किरण ठरली आहे. आम्हाला मिळालेलं प्रशिक्षण आमच्या स्वावलंबनासाठी मोठा आधार ठरणार आहे. देशभरातील वाढत्या बेरोजगारीच्या समस्येला मात देण्यासाठी अशा स्वरूपाच्या प्रशिक्षण योजना उपयुक्त ठरत आहेत, असे मत प्रशिक्षणार्थींना व्यक्त केले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणि इतर शासकीय योजनांच्या साहाय्याने हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे तरुणाई सरकारी नोकऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय उभारून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


Recent Comments