बेळगाव ग्रामीण तालुक्यातील गणेशपूर गावातील मेल्विन फर्नांडिस या युवकाने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन पीयूसी दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळवले आहेत. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल युवक काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर यांनी त्याचा सत्कार केला.

मेल्विन फर्नांडिस सेंट पॉल कॉलेजचा विद्यार्थी असून त्याचे वडील ऑटो चालक आहेत. घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या आईने गृहलक्ष्मी योजनेतून मिळालेला निधी मुलाच्या शिक्षणासाठी वापरला. शिक्षणासाठी लागणारी पुस्तके, फी आणि इतर खर्च गृहलक्ष्मी योजनेच्या रकमेवरच पार पडले. आईने सरकारच्या योजनेचा शहाणपणाने वापर करत मुलाच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी केली. मेल्विनने यशस्वीपणे 93 टक्के गुण मिळवून समाजात एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलं आहे.

यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार करण्यासाठी मृणाल हेब्बाळकर यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. मेल्विनने केवळ आपलेच नव्हे, तर आपल्या कुटुंबाचे आणि गावाचेही नाव उज्ज्वल केले, असे ते म्हणाले. सरकारने सुरू केलेल्या गृहलक्ष्मी योजनेचा खराखुरा लाभ अशा गरजू कुटुंबांना मिळतो आहे, याचे समाधान आहे, असेही त्यांनी नमूद केले. या विद्यार्थ्याच्या यशाबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही आनंद व्यक्त करत मेल्विनला पुढील शिक्षण आणि उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.


Recent Comments