राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सरकारची तिजोरी रिकामी झाल्याने जनतेच्या खिशाला कात्री लावून तिजोरी भरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघात भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारविरोधात आंदोलन केले. महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून, सरकारच्या धोरणांविरोधात भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला.

कित्तूर मतदारसंघातील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी राणी चन्नम्मा सर्कलपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आंदोलन केले.

दुधाच्या दरातील वाढ, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतील वाढ, बसभाडेवाढ तसेच शेतीसाठी आवश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत आले आहेत. सरकारची तिजोरी रिकामी असल्याचे कारण पुढे करून जनतेवर सातत्याने महागाईचा बोजा टाकला जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला.
राज्य सरकारने तातडीने महागाईवर नियंत्रण आणावे, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.
काँग्रेस सरकारवर भ्रष्टाचार आणि महागाईचे आरोप करत भाजप नेत्यांनी सरकारच्या धोरणांविरोधात आगामी काळात जनतेच्या वतीने तीव्र लढा देण्याचा इशारा दिला. सर्वसामान्यांच्या खिशावर भार टाकणाऱ्या सरकारला योग्य उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कित्तूर मतदारसंघात भाजप विजय मिळवून पक्षाचा झेंडा फडकवेल, असा विश्वासही भाजप नेत्यांनी व्यक्त केला.


Recent Comments