Chikkodi

रायबाग मतदारसंघात एक कोटींच्या रस्ते विकासकामांना प्रारंभ

Share

चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या हस्ते रायबाग विधानसभा मतदारसंघातील चार गावांमध्ये एक कोटी रुपये खर्चाच्या विविध रस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. करोषी, बंबलवाड, नागरमुन्नोळी आणि उमराणी या गावांमध्ये ही कामे करण्यात येणार आहेत.

यावेळी बोलताना प्रियांका जारकीहोळी यांनी, काही रस्त्यांच्या कामांना खासदार निधीतून, तर काही कामांना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजुरी मिळाल्याचे सांगितले. आगामी पंचायत निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे विकासकामांना अडथळा येऊ नये, यासाठी कामांना आताच सुरुवात करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निधीची कमतरता असलेल्या ग्रामपंचायतींनाही खासदार निधीतून शक्य ती मदत केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या कार्यकाळात रायबाग मतदारसंघात सुमारे १०० ते १५० कोटी रुपयांची विकासकामे झाल्याचा दावा काँग्रेस नेते महावीर मोहिते यांनी केला. तसेच निरंतर ज्योती योजनेसाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून, दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊन आवश्यक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: