हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील सुवर्णसौध परिसरात दोन किलोमीटर क्षेत्रात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला.
शनिवार, २ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौधच्या दोन्ही बाजूंनी दोन किलोमीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

शांततेत आंदोलन करण्यासाठी कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगीशिवाय जमाव जमवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणे किंवा सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करणे खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अंतर्गत लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून बेकायदेशीर जमाव जमवणे किंवा शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला.
राष्ट्रीय महामार्गावर मालवाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. रास्ता रोकोमुळे सामान्य नागरिकांसह अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे महामार्गावर कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर रास्ता रोको करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असे प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.


Recent Comments