विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी बेळगावच्या केएलई संस्थेतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ झाला. या प्रदर्शनात शंभरहून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या.

केएलई संस्थेच्या राजा लखमगौडा विज्ञान संस्था (स्वायत्त) आणि राजा लखमगौडा पीयू विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विज्ञान प्रदर्शन-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातील सी. व्ही. रमण सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभात हुबळी येथील केएलई तंत्रज्ञान विद्यापीठाचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नरसिंह अय्याचित यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यामध्ये शंभरहून अधिक शाळांमधील माध्यमिक आणि पीयू स्तरावरील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध वैज्ञानिक प्रयोग व नाविन्यपूर्ण प्रतिकृती मांडल्या.


यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केएलई सोसायटीचे संचालक महांतेश एम. कवटगीमठ यांनी विज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी झाला पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्सुनामीचा पूर्वअंदाज, एल निनोविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याचे महत्त्व तसेच कोविड काळात भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित करून केलेल्या कार्याचा त्यांनी उल्लेख केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता जागतिक स्तरावर पोहोचावी आणि बेळगावच्या भूमीतून एडिसन व राइट बंधूंसारखे शास्त्रज्ञ घडावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष लिंगौड व्ही. देसाई होते. व्यासपीठावर व्यवस्थापन मंडळाचे सदस्य गिरीश कत्ती, आरएलएस विज्ञान संस्थेचे प्राचार्य डॉ. जे. एस. कावळेकर आणि आरएल पीयू महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. सी. कामगोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


Recent Comments