बेळगाव येथे २ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत असून, त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या महामेळाव्याला बंदी घालण्याची शक्यता लक्षात घेता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते विजय देवणे यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.

महामेळाव्यावर बंदी घातल्यास महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकातील मंत्री आणि आमदारांविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.

२ डिसेंबर रोजी बेळगावात होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील नेत्यांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून परराज्यातील नेत्यांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यासह प्रतिबंधात्मक आदेश लागू केले जातात.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून चर्चा करून महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रवेशावरील निर्बंध हटवावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदन देऊनही २ डिसेंबरच्या महामेळाव्याला प्रतिबंधात्मक आदेश लागू करून अडथळा निर्माण केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा विजय देवणे यांनी दिला. बेळगावात महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश नाकारल्यास भविष्यात महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटकातील मंत्री, खासदार आणि आमदारांना रोखून शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments