महिलेला खासगी छायाचित्रे पतीला पाठविण्याची तसेच पतीची हत्या करण्याची धमकी देऊन १३ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.
गोकाक तालुक्यातील देवगौडनहट्टी येथील लक्ष्मी बारिमरद या महिलेला खानगाव येथील सचिन शिवाजी पुजेरी याने ब्लॅकमेल केले होते. दोघांचे एकत्रित असलेले छायाचित्र पतीला पाठवून संसार उद्ध्वस्त करण्याची तसेच पतीची हत्या करण्याची धमकी त्याने दिली होती. या धमकीमुळे भयभीत झालेल्या महिलेकडून आरोपीने गत २७ सप्टेंबर रोजी ९५ ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत १३ लाख २० हजार रुपये आहे, तसेच पाच हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने घेतली होती.

याप्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक के. बी. वाळीकार आणि त्यांच्या पथकाने आरोपी सचिन पुजेरी याला अटक केली. त्याच्याकडून लुटलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे कौतुक केले.


Recent Comments