बेळगाव येथील केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालयात ‘समकालीन काळात कायदे शिक्षणाची नव्याने संकल्पना’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कट्टी यांनी मार्गदर्शन केले.

बेळगाव येथील केएलएस महाविद्यालयाच्या वेणुगोपाल सभागृहात बंगळुरू येथील कर्नाटक विधी व संसदीय सुधारणा संस्था आणि बेळगावच्या केएलएस राजा लखमगौडा विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल कट्टी यांच्या हस्ते झाले.


यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कायद्याच्या विद्यार्थ्यांमधील विचार करण्याची क्षमता आणि आपले म्हणणे प्रभावीपणे पटवून देण्याचे कौशल्य दिवसेंदिवस कमी होत आहे. ही कायदा व्यवस्थेसमोरील मोठी समस्या आहे. विद्यार्थी नियमितपणे वर्गांना उपस्थित न राहता केवळ सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होत असल्याबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली. कायदे शिक्षणात केवळ सैद्धांतिक ज्ञान पुरेसे नसून, प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि व्यावहारिक दृष्टिकोनही तितकाच आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षापासूनच वकिली व्यवसाय किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात करिअर करण्याचे स्पष्ट ध्येय निश्चित करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या कार्यक्रमाला बंगळुरू येथील कर्नाटक विधी व संसदीय सुधारणा संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. एस. पाटील सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष आर. एस. मुतालिक देसाई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवाळदार, समन्वयक डॉ. शिल्पा रायकर, संशोधन विभागप्रमुख रेवय्या ओडयार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments