बेळगावात मराठी नामफलक हटविल्याचा आरोप करत म. ए. समितीने या कारवाईला विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाई थांबविण्याची मागणी केली.

१ नोव्हेंबर रोजी कन्नड राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कायदेशीर नोटीस न देता मराठी आणि इंग्रजी नामफलक झाकण्यास किंवा हटविण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप समितीने निवेदनात केला आहे.

रामलिंगखिंड गल्लीतील रंगुबाई प्लेस येथील म. ए. समितीच्या कार्यालयाचा नामफलकही खडेबाजार पोलिसांनी बळजबरीने हटविण्याचा आग्रह धरल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही संघटनेच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली असल्याचा दावा करण्यात आला आहे. कॉलेज रोडवरील शिवसेना ऑटो स्टँड परिसरात ६० टक्क्यांहून अधिक मराठी भाषिक असूनही कोणतीही पूर्वसूचना न देता मराठी नामफलक झाकण्यात आल्याचा आरोप म. ए. समितीचे नेते अॅड. अमर येळ्ळूरकर यांनी केला. व्यावसायिकांकडून अनेक वर्षांपासून वापरात असलेले मराठी नामफलक हटविण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचेही त्यांनी सांगितले.
काही कन्नड समर्थक संघटनांकडून कायदा हातात घेऊन मराठी नामफलकांना लक्ष्य केले जात असल्याने कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये मतभेद निर्माण होत असल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने कोणत्याही संघटनेच्या दबावाला बळी न पडता मराठी नामफलक हटविण्याची कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी समितीने केली. पोलिसांची कथित बेकायदेशीर कारवाई सुरूच राहिल्यास मराठी भाषिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही म. ए. समितीच्या नेत्यांनी दिला.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे नेते व माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, माजी नगरसेवक नेताजीराव जाधव, रणजित चव्हाण-पाटील, विकास कलघटगी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments