लग्नाचे आश्वासन देऊन तीन ते चार वर्षे प्रेमसंबंध ठेवले. मात्र, लग्नास नकार दिल्यानंतर तरुणीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोकाक शहर पोलिसांनी एसएसबी जवानाला अटक केली आहे.

रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील रक्षिता राजू सरीकर या २५ वर्षीय तरुणीची हत्या झाली. अथणी तालुक्यातील अडहट्टी गावचा रहिवासी आणि बिहारमध्ये एसएसबीच्या २१ व्या बटालियनमध्ये कार्यरत असलेला बसाप्पा सिद्धाप्पा सातण्णावर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.


२८ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी रक्षिताला दुचाकीवरून हारुगेरी येथून गोकाक धबधब्याजवळ घेऊन आला होता. तेथे रस्त्यालगतच्या कठड्यावर बसून दोघे बोलत असताना लग्नाच्या विषयावरून वाद झाला. संतापलेल्या बसाप्पाने रक्षिताच्या कानाजवळ थप्पड मारली. त्यानंतर गळा आवळून आणि ओढणीने गळा आवळत तिची हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह डोंगराच्या उतारावरील झुडपांमध्ये फेकून तो पळून गेला.

रक्षिताचा भाऊ दर्शन राजू सरीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोकाक शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामगोंड बसर्गी, डीवायएसपी रवी डी. नायक आणि पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर यांच्या देखरेखीखाली तपास पथकाने तपास केला.
पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांत गुन्ह्याचा छडा लावणाऱ्या तपास पथकाचे पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी कौतुक केले.


Recent Comments