धारवाडमधील संगम चित्रपटगृहाजवळ दारूच्या नशेत एका व्यक्तीने स्कूटी आणि दोन लाख रुपये चोरीला गेल्याचा गोंधळ घातला. पोलिसांनी शोध घेतला असता स्कूटी बारसमोरील पार्किंगमध्येच असल्याचे आढळले.
धारवाडच्या गोवनकोप्प येथील भीमाप्पा जड्डगण्णावर असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने बँकेतून दोन लाख रुपये काढून स्कूटीच्या डिक्कीत ठेवले होते. त्यानंतर रस्त्यावरील एका बारसमोर स्कूटी पार्क करून तो मद्यपान करण्यासाठी गेला.

मद्यपान करून बाहेर आल्यानंतर स्कूटी आणि पैसे गायब झाल्याचे सांगत त्याने गोंधळ घातला. तसेच ११२ क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलावले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी स्कूटीच्या क्रमांकावरून शोध घेतला असता ती बारसमोरील पार्किंगमध्येच आढळली. स्कूटीची चावी घेऊन डिक्की तपासली असता पैशांची बॅग आणि दोन लाख रुपयेही सुरक्षित असल्याचे दिसून आले. या व्यक्तीच्या गोंधळामुळे पोलिसांना मात्र काही काळ धावपळ करावी लागली.


Recent Comments