Raibag

रायबाग तालुक्यातील जुन्या दिग्गेवाडीतील मगर अखेर जेरबंद

Share

रायबाग तालुक्यातील जुन्या दिग्गेवाडी गावातील कृष्णा नदीकाठी वावर असणाऱ्या मगरीला अखेर पकडण्यात वनविभागाला यश आले असून ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

रायबाग तालुक्यातील जुन्या दिग्गेवाडी गावात कृष्णा नदीकाठच्या गंगाधर नागराळे यांच्या शेतात मोठी मगर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. गेल्या काही दिवसांपासून शेतात आणि नदीकाठी फिरणाऱ्या या मगरीमुळे ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली वावरत होते.

स्थानिकांची अडचण लक्षात घेऊन रायबाग मंडळ शेतकरी मोर्चा अध्यक्ष राजू चौगुले यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुणांनी दोरीच्या साहाय्याने प्रसंगावधान राखून मगरीला सुरक्षितपणे पकडले.

या घटनेची माहिती दिग्गेवाडीतील नेत्यांनी रायबाग वनक्षेत्र अधिकाऱ्यांना फोनवरून दिली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मगरीला ताब्यात घेतले आणि सुरक्षित जंगलात नेऊन सोडले.

मगर पकडल्यामुळे जुन्या दिग्गेवाडीतील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या धोकादायक कार्यात धैर्याने सहभागी झालेल्या सचिन खंडेराजूरे, देवराज गस्ते, बोला कडाळे, मंजुनाथ खंडेराजूरे, विरूपाक्ष खोत, रवींद्र चौगुले आणि नायकप्पा नागराळे या तरुणांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

Tags: