बेळगावमध्ये येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या पूर्वतयारीसाठी आणि जनजागृतीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मराठी भाषिक जनतेवरील अन्याय, प्रशासनाची भूमिका आणि आंदोलनाच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी १ नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने घेतला आहे. प्रशासनाची परवानगी असो वा नसो, समितीने निश्चित केलेल्या ठिकाणी मराठी भाषिक आणि कार्यकर्त्यांनी सकाळीच मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले. या आंदोलनातून प्रशासनाला मराठी जनतेच्या एकजुटीची जाणीव करून देण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.

शहरातील प्रत्येक भागात आणि गल्लीबोळांत बैठका घेऊन तळागाळातील लोकांपर्यंत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिथे गरज असेल तिथे समितीचे प्रमुख पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील, असे प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले.
समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी, आपला लढा कोणत्याही नेत्यांच्या व्यक्तिगत भूमिकेवर अवलंबून नसून मराठी जनतेच्या प्रामाणिक भावनेवर आधारित आहे, असे सांगितले. गेल्या ७० वर्षांपासून हा लढा कोणत्याही परिस्थितीत मागे हटलेला नाही. पोलिसांनी लाठीमार केला तरी बेळगावची जनता ठामपणे उभी राहिली आहे, असे ते म्हणाले. रणजित चव्हाण-पाटील यांनीही, पराभव मानणे आमच्या रक्तात नाही आणि संयमाने व दृढतेने हा लढा पुढे सुरूच राहील, असे नमूद केले. तसेच याप्रकरणी सुप्रीम कोर्टातही कायदेशीर लढा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीस ॲडव्होकेट अमर येळ्ळूरकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नेताजीराव जाधव यांच्यासह समितीचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments