चिक्कोडी तालुक्यातील जोडट्टी गावातील शेलव्वा देवी मंदिरातील प्रसाद खाल्ल्याने १०० हून अधिक भाविकांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेनंतर आपत्कालीन परिस्थिती ओढवूनही तालुका आरोग्याधिकारी गैरहजर असल्याने आमदारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

चिक्कोडी तालुक्यातील जोडट्टी गावातील शेलव्वा देवी मंदिराती महाप्रसाद सेवन केल्यानंतर अनेक भाविकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. बाधित भाविकांना तातडीने कब्बूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच कब्बूर रुग्णालयात भाविकांची विचारपूस करण्यासाठी पोहोचलेले आमदार दुर्योधन ऐहोळे यांना एवढी मोठी आणीबाणीची परिस्थिती असतानाही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजशेखर खणदाळे गैरहजर असल्याचे दिसून आले. यामुळे तीव्र संताप व्यक्त करत आमदारांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना फोनवरून कडक शब्दांत सुनावले.

नागरिकांच्या जिवाशी खेळ न करता तातडीने रुग्णालयात हजर राहून रुग्णांना योग्य उपचार मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. सध्या रुग्णालयात सर्व बाधितांवर उपचार सुरू आहेत.


Recent Comments