Belagavi

वेदांत फाउंडेशनतर्फे गवळीवाडा गाव दत्तक; सर्वांगीण ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ

Share

बेळगाव येथील वेदांत फाउंडेशनच्या वतीने खानापूर तालुक्यातील मोरब येथील गवळीवाडा गाव दत्तक घेण्यात आले असून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी हाती घेण्यात आलेल्या ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ बुधवारी (ता. २१) उत्साहात झाला. ग्रामविकास, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गावाचा सर्वांगीण कायापालट करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. भविष्यात गावाच्या गरजांनुसार विविध विधायक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दैनिक ‘सकाळ’च्या बेळगाव आवृत्तीचे विशेष प्रतिनिधी मल्लिकार्जुन मुगळी आणि ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’चे मुख्य प्रतिनिधी सुनील पाटील यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन झाले. गावातील ज्येष्ठ नागरिक काळू थोरवत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. बेळगाव तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष शेखर करंबळकर, ॲड. सुधीर चव्हाण, वेदांत फाउंडेशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील, अरुण मु. चंडीकर, नारायण नलवडे आणि शुभांगी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

गावाच्या विकासासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे असून, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वेदांत फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विधायक कार्याचे कौतुक करण्यात आले. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेणारे सतीश पाटील यांच्या कार्याचाही विशेष गौरव करण्यात आला. गावाच्या विकासासाठी फाउंडेशनने केलेल्या प्रयत्नांची जाणीव ठेवून भविष्यात गावातील विद्यार्थ्यांनीही समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

देणगीतून सामाजिक बांधिलकी

ग्रामविकास प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त विविध संस्था आणि दानशूर व्यक्तींनी साहित्य व आर्थिक स्वरूपात मदत दिली. प्रेमराज चिंडक फाउंडेशनतर्फे २७५ ताटे देण्यात आली. वेदांत फाउंडेशनतर्फे ३५ हजार रुपयांचा रंग देण्यात आला. श्रीकांत नगारे यांनी सात हजार रुपये खर्चून नामफलक तयार करून दिला. हजारे किचनतर्फे २७५ वाट्या देण्यात आल्या, तर कल्पना गाडगीळ यांनी पाच हजार रुपयांची मदत केली. या सहकार्यातून ग्रामविकासाच्या उपक्रमाला हातभार लागला.

भजन, गज्जो नृत्याने रंगत

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भजनाने उपस्थितांची मने जिंकली. धनगर बांधवांचे पारंपरिक गज्जो नृत्य हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. मुंबई येथील सुदाम प्रभू यांचे प्रवचन, हरिभजन आणि संत मंडळींचे नगरसंकीर्तन यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरणाची जोड मिळाली. मोहन पाटील, रविंद्र हरगुडे, अनुतारीहाळकर आणि वैजू गुरव यांनी समयोचित भाषणे करून ग्रामविकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

गावाच्या प्रगतीसाठी दीर्घकालीन प्रयत्न

गवळीवाडा हे संपूर्ण गाव वेदांत फाउंडेशनने दत्तक घेतले असून, आगामी काळात गावाच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासात्मक उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. ग्रामस्थांचा सहभाग, सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन या माध्यमातून गावाच्या विकासाला दिशा देण्याचा प्रयत्न या प्रकल्पातून केला जाणार आहे. उद्घाटन सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी उपक्रमांमधून गावाच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Tags: