जपानमध्ये होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारतीय पॅरा-क्रीडा संघाचे नेतृत्व बेळगावचे जयवंत जी. हम्मणावर भूषवणार आहेत. भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (पीसीआय) सरचिटणीस असलेल्या त्यांच्या या कामगिरीमुळे बेळगाव आणि कर्नाटकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
जपानच्या आयची येथे आयोजित करण्यात आलेल्या आगामी आशियाई पॅरा गेम्ससाठी भारतीय पॅरा-क्रीडा शिष्टमंडळाचे नेतृत्व भारतीय पॅरालिम्पिक समितीचे (पीसीआय) सरचिटणीस आणि बेळगावच्या बसवन कुडची येथील जयवंत जी. हम्मणावर करणार आहेत. यापूर्वी गोवा राज्याच्या पॅरालिम्पिक समितीचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले जयवंत यांनी देशात पॅरा-क्रीडेच्या प्रसारासाठी आणि प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

त्यांच्या नेतृत्वाखालील काळात पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक्समध्ये भारतीय पॅरा-खेळाडूंनी ७ सुवर्ण, ९ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. यावेळच्या आशियाई पॅरा गेम्समध्येही भारतीय खेळाडू सर्व जुने विक्रम मोडून अधिकाधिक पदके जिंकतील अशी मोठी अपेक्षा आहे. जयवंत यांच्या या यशाबद्दल बेळगावच्या जनतेने आणि क्रीडाप्रेमींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


Recent Comments