बेळगाव तालुक्यातील केदनूर ग्रामपंचायतीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाच्या वतीने तालुका पंचायत कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
बेळगाव तालुक्यातील केदनूर ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण अहवालात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, दोषींवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाने बेळगाव तालुका पंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

९ जून २०२६ रोजीच केदनूर ग्रामपंचायतीच्या पंचायत विकास अधिकाऱ्याविरोधात (पीडीओ) अधिकृत तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता, तरीही अद्याप कोणतीही चौकशी किंवा योग्य कारवाई करण्यात आलेली नाही, असा संताप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी (ईओ) संशयित पीडीओला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांनी केला.
ग्रामपंचायतीच्या लेखापरीक्षण अहवालात निविदा प्रक्रिया, बोगस व्हाऊचर्स आणि बनावट बिले तयार करून लाखांचा गैरव्यवहार केल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. तसेच २०२२ ते २०२६ या कालावधीतील १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतही मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही अधिकारी डोळेझाक करत आहेत, असा आरोप डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघाचे संस्थापक तथा राज्य अध्यक्ष लक्ष्मण कोलकार यांनी केला.
दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई होईपर्यंत किंवा जिल्हा पंचायतीकडून अधिकृत आदेश निघेपर्यंत आपले आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.


Recent Comments