Delhi

दिल्लीत भाजपविरोधात कर्नाटक काँग्रेस नेत्यांचे जोरदार आंदोलन

Share

नवी दिल्ली येथे एसआयआर रद्द करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धडक आंदोलनात कर्नाटक काँग्रेसच्या बड्या नेत्यांची फौज मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

या वेळी केपीसीसी अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारवर तीव्र हल्लाबोल केला.संविधानाने नागरिकांना दिलेला मतदानाचा मूलभूत हक्क केंद्र सरकार हिरावून घेत आहे आणि निवडणूक आयोग हा केंद्र सरकारचे हातचे बाहुले बनले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

माजी मंत्री व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, “केंद्रातील भाजप सरकार आणि निवडणूक आयोग मिळून लोकशाही आणि संविधानाचा थेट गळा घोटण्याचे काम करत आहेत. जनतेच्या मतदानाच्या अधिकारावर गदा आणली जात असून संपूर्ण देशात अस्वस्थतेचे वातावरण आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि नागरिकांच्या घटनात्मक हक्कांच्या पुनरुज्जीवनासाठी आमचा हा लढा सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी दिला.

भाजप आणि आरएसएस हे संविधान आणि लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात काम करत असून, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. तसेच या आंदोलनाला काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही पाठिंबा देत तीव्र निदर्शने केली.

या निदर्शनांमध्ये केपीसीसी अध्यक्ष बी.के. हरिप्रसाद, माजी मंत्री व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासह कर्नाटकातील अनेक आमदार आणि प्रमुख काँग्रेस नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: