Hukkeri

हुक्केरीत २४ तासांत साखळी चोरांना अटक

Share

हुक्केरी शहरात गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत आरोपींना अटक करण्यात हुक्केरी पोलिसांना यश आले आहे.

हुक्केरी शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी आणि साखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. पहाटेच्या वेळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांना तसेच बस स्थानकावर एकट्या असलेल्या महिलांचे दागिने आणि घराबाहेर उभी केलेली वाहने चोरणाऱ्या दोन भावांना पोलीस निरीक्षक शिवशंकर गणाचारी यांच्या नेतृत्वाखालील क्राइम टीमने अटक केली.

५ ऑक्टोबर रोजी शिरगाव येथील काशव्वा निडसोसी या महिला शेतात काम करत असताना, ऊस तोडणीच्या बहाण्याने आलेल्या दोन तरुणांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास वेगाने फिरवत २४ तासांत हुक्केरीच्या शिवाजी नगर येथील प्रल्हाद कलंदर महिलांदे (वय २१) आणि त्याचा भाऊ राज कलंदर महिलांदे (वय १८) यांना ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केली असता, त्यांनी हुक्केरी बस स्थानकावर एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र चोरल्याची आणि तीन दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. पोलीस कारवाईत ३ दुचाकींसह सोन्याचे दागिने जप्त करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.

बेळगावचे पोलीस अधीक्षक के. रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवशंकर गणाचारी, कर्मचारी राजू गस्ती, सी. डी. पाटील, अर्जुन मसरगुप्पी, मंजुनाथ कब्बुरी, आर. एम. पडतारे, हनुमन्नवर, करेन्नवर आणि सचिन पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

राजू बागलकोटी, इन न्यूज, हुक्केरी

Tags: