बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्याचा समावेश दुष्काळग्रस्त भागाच्या यादीत न केल्याने आमदार निखिल कत्ती यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांच्या नेत्यांनी व शेतकऱ्यांनी आंदोलन केले.

सकाळी पी कार्ड बँक आवारात एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढून कोर्ट सर्कल गाठले आणि तेथे रस्ता रोको आंदोलन केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार निखिल कत्ती यांनी सांगितले की, हुक्केरी तालुक्यात सुरुवातीला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने ताण दिल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हुक्केरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना पिक नुकसानभरपाई मिळावी, शेतीकर्ज माफ करावे आणि तलाव भरण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुरळीत वीजपुरवठा करावा, अशा मागण्या त्यांनी मांडल्या.
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक शिवशंकर गणाचारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात भाजप नेते बसवराज हुंद्री, महावीर निलजगी, सत्तेप्पा नाईक, शीतल ब्याळी, गुरुराज कुलकर्णी, सुनील पर्वतराव, रामचंद्र जोशी, सुमित पाटील, कालगौडा पाटील, राजू मुन्नोळी, रायप्पा डूग, प्रज्वल निलजगी, सातप्पा नाईक, संजू कंठी यांच्यासह हुक्केरी, संकेश्वर व परिसरातील शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments