बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील जुने वंटमुरी गावात बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध केल्याच्या रागातून वाळू माफियांनी एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे.

या घटनेनंतर वाळू माफियांच्या दहशतीविरोधात आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी पीडित कुटुंबाने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे (एसपी) तक्रार अर्ज सादर केला आहे.

जुने वंटमुरी परिसरात कोणत्याही परवानगीशिवाय राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून यामुळे नदीपात्र, शेतजमिनींचे नुकसान होत आहे, तसेच वाळूच्या वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
या बेकायदेशीर व्यवसायाची माहिती पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना देतात या संशयावरून महानतेश मरुती काटाबळी, लक्षप्पा व केंपण्णा काटाबळी यांनी बोलेरो वाहनातून येऊन रवी कल्लाप्पा पुजारी यांच्या घरावर हल्ला चढवला.
या वेळी संशयितांनी रवी पुजारी यांच्या पत्नी शोभा यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले, तर आई गौराब्बा यांना काठीने मारहाण केली. सायंकाळी कोयत्याने मारून टाकण्याची धमकी देत आरोपी पसार झाले असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments