धारवाड येथे मद्यधुंद अवस्थेत एका व्यक्तीने स्वतःच्या राहत्या घराला आग लावल्याची घटना घडली आहे. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

धारवाड येथील कुरुबर गल्लीत ही घटना घडली. जावेद दलायत असे आग लावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

संबंधित घराच्या आतील भागातून आग आणि धूर बाहेर येत असल्याचे दिसताच स्थानिक नागरिक सतर्क झाले. त्यांनी लागलीच शेजारच्या घरांमध्ये आग पसरू नये यासाठी प्रयत्न सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने अग्निशामक दलाने अथक प्रयत्नांनंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
आग लावल्यानंतर संबंधित व्यक्तीने शहर पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे.


Recent Comments