स्वातंत्र्य लढ्यात विविध संघटनांना पाठींबा देऊन त्यांना भक्कम पाठबळ देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य लिंगायत समाजाने केले आहे, असे प्रतिपादन कूडलसंगमचे प्रथम जगद्गुरू बसव जयमृत्यूंजय महास्वामीजी यांनी केले.


हुक्केरी शहरात लिंगायत पंचमसाली समाज व उपसमाज सेवा संघाच्या वतीने रवदी फार्महाऊस येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संघाच्या सदस्यांना प्रमाणपत्र वाटप तसेच उच्च श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विरक्त मठाचे शिवबसव महास्वामीजी आणि हुल्लोळीहट्टीच्या शिवानंद मठाचे मंजुनाथ स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तत्पूर्वी, महिलांनी पूर्णकुंभ आणि पुष्पवृष्टी करत स्वामीजींचे स्वागत केले.


आपल्या आशीर्वचनात जयमृत्यूंजय स्वामीजी म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी लिंगायत समाजाने नेहमीच सहकार्य केले. आजही लिंगायत आणि सर्व उपसमाजांनी एकत्र येत संघटित राहण्याची नितांत गरज आहे.

याप्रसंगी मंजुनाथ स्वामीजी यांनीही मनोगत व्यक्त करताना समाजातील एकी आणि प्रगतीवर भर दिला. कार्यक्रमादरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

या सोहळ्याला जिल्हाध्यक्ष निंगप्पा पिरोज, विजय रवदी, चंद्रशेखर पाटील, राजू मुन्नोळी, चिदू बस्तवाडे, सोमनाथ परकनट्टी, प्रकाश पाटील, ज्योतिबा दुप्पट्टी, शिवानंद पट्टणशेट्टी, रवींद्र परकनट्टी यांच्यासह संघाचे सदस्य, महिला व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments