हुक्केरी तालुक्यात मुस्लिम बांधवांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद श्रद्धा आणि उत्साहात साजरी केली. हुक्केरी, संकेश्वर, यमकनमर्डी आणि पाश्चापूर येथील मशिदी तसेच हुक्केरी शहरातील पैगंबर दर्ग्यात विशेष प्रार्थना करण्यात आली.


मौलाना कुतुबुद्दीन यांनी ईद म्हणजे आनंद आणि मिलाद म्हणजे जन्मकाळ असल्याचे सांगितले. ईद-ए-मिलादचा सण दान, पुण्य आणि त्यागाची प्रेरणा देणारा असून गरीब-श्रीमंत, शत्रू-मित्र, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न करण्याचा संदेश देतो, असे त्यांनी सांगितले. हुक्केरीत हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हा सण साजरा केल्याचेही त्यांनी नमूद केले.


अकरा जमातींचे अध्यक्ष सलीम नदाफ यांनी देशात शांतता आणि सौहार्द नांदावे, पाऊस आणि पीक चांगले यावे तसेच देशातील नागरिक सुखी राहावेत, अशी प्रार्थना केली. त्यांनी मुस्लिम आणि हिंदू बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
हजारो मुस्लिम समाजबांधव, मुले आणि युवकांनी पांढरे कपडे परिधान करून हातात धार्मिक ध्वज घेत मिरवणुकीत सहभाग घेतला. मिरवणूक मासाबी दर्ग्याकडे गेल्यानंतर नव्या बसस्थानकाजवळील पैगंबर दर्ग्यात गिलाफ अर्पण करण्यात आला आणि सामूहिक महाप्रसादाचा लाभ घेण्यात आला.
यावेळी मुस्लिम समाजातील बाबाजान काझी, मुफ्ती अमजद खान, रहमतुल्ला मसाबरी, अस्लम शेकबडे, इम्तियाज नदाफ, शाहजान बडगावी, नाशीर सुतार, इफ्तिकार पीरजादे, मोहम्मद नदाफ, मीरा चौधरी, कबीर मल्लिक, आदम खानजादे, सोहेब बडगावी, राजू मुजावर, मल्लिक मुजावर, इस्माईल मुजावर, आलम मकानदार यांच्यासह विविध मदरशांमधील विद्यार्थी आणि मौलाना उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक शिवशंकर गणाचारी यांच्या नेतृत्वाखाली अनुचित प्रकार टाळण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी पैगंबर दर्ग्यात २८वा महाप्रसाद आयोजित करण्यात आला.


Recent Comments