समाजाचा मुख्य दुवा म्हणून कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता सरकारने व समाजाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. शिक्षक हेच खऱ्या अर्थाने देश आणि समाजाचे निर्माते आहेत, असे प्रतिपादन बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी केले.


बेळगाव मधील गांधी भवनात जिल्हा पंचायत, शाळा शिक्षण विभाग आणि विभागीय शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक दिन सोहळ्याचे उद्घाटन करताना ते बोलत होते.


प्रारंभी डीडीएसपी लीलावती हिरेमठ यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या प्रादेशिक आयुक्त गायत्री के. एम. यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शिक्षकांना विशेष महत्त्व दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल घडवावे.

या प्रसंगी उप्पार विकास महामंडळाचे राज्य अध्यक्ष भरमण्णा उप्पार यांनीही शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमादरम्यान २०२६ च्या ‘प्रतिभा कारंजी’, कलोत्सव आणि क्रीडा स्पर्धांचे प्रातिनिधिक प्रात्यक्षिकांद्वारे उद्घाटन करण्यात आले.
सोहळ्यात प्राथमिक विभागातील ३९ आणि माध्यमिक विभागातील १९ निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या प्राथमिक शाळेच्या २९ आणि माध्यमिक शाळेच्या २१ शिक्षकांना जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. यासोबतच २०२६ च्या एस.एस.एल.सी. परीक्षेत १०० टक्के निकाल देणाऱ्या २० हून अधिक माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचाही विशेष सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला जिल्हा शासकीय कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बसवराज रायव्वागोळ, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश गोणी, गजानन सोगलन्नवर, अशोक खोत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, निवृत्त शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बीईओ रवी भजंत्री यांनी आभार मानले.


Recent Comments