Kagawad

कात्राळ ग्रामस्थांचा रस्ता बंद: तात्काळ तोडगा काढण्याची कागवाड तहसीलदारांकडे मागणी

Share

कागवाड तालुक्यातील कात्राळ गावाजवळील आईनापूर हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वापरात असलेला रस्ता अचानक बंद करण्यात आला असून, हा रस्ता वाहतुकीसाठी तात्काळ मोकळा करून द्यावा या मागणीसाठी बाधित १० कुटुंबांनी कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादीमनी यांना निवेदन दिले आहे.

याप्रसंगी बोलताना वकील बाळासाहेब राव यांनी सांगितले की, आईनापूर हद्दीतील सर्व्हे नंबर ७६५ मधील शेतातून जाणारा हा रस्ता स्थानिक नागरिक आणि त्यांचे पूर्वज गेल्या ७० ते ८० वर्षांपासून वापरत आहेत. सध्या याच रस्त्यावर अवलंबून ९ ते १० कुटुंबांनी आपली घरे बांधली असून त्यांच्याकडे ८० हून अधिक जनावरे आहेत. पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, शाळकरी मुलांची ये-जा, शेतीचे साहित्य आणि पेरणीची कामे या सर्व बाबींसाठी हा एकच रस्ता उपलब्ध असून याला कोणताही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. असे असताना संबंधित सर्व्हे नंबरचे मालक अशोक रामचंद्र मावली हे या मार्गावरील वाहतुकीस अटकाव करत आहेत. यामुळे सुमारे ६० ते ७० एकर शेतातील पिकांची वाहतूक करणे आणि शेतीची कामे करणे अशक्य झाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन रस्त्यातील अडथळा दूर करून तात्काळ योग्य ती कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्रीकांत नरोट्टी, महावीर नरोट्टी, सदाशिव नरोट्टी, आमीनसाब मुल्ला, सरिता खटांवी, तुकाराम रसाळ, लक्ष्मण रसाळ, अरविंद नरोट्टी, सुरेश नरोट्टी, संगप्पा हुब्बळ्ळी, वरुण यरंडोली, म्हैसूर कुडची, रावबहाद्दूर कुडची, भरतेश यरंडोली, निंगप्पा खटांवी आणि परशुराम खटांवी यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: