Belagavi

बेळगावात सीसीबीची धडक कारवाई: ३ लाखांच्या हेरॉईनसह संशयित गजाआड

Share

बेळगावात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू ठेवली आहे. मंडोळी रस्त्यावरील एका धाब्याजवळ अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या एका संशयिताला बेळगाव शहर सीसीबी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बेळगावातील पीरनवाडी येथील अन्सारी गल्लीतील रहिवासी आफताब महंमदहनीफ अत्तार (वय २६) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. मंडोळी रस्त्यावरील विजया धाब्याजवळ हा अमली पदार्थांची विक्री करत असताना सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

संशयिताकडून २ लाख ८० हजार रुपये मूल्याचे १४.१३ ग्रॅम हेरॉईन (१०५ पुड्या) आणि १० हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हा अमली पदार्थ महाराष्ट्रातील मुंबई येथील कोळीवाडा भागातील शाझियान अम्मा नामक महिलेकडून आणल्याची कबुली संशयिताने दिली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: