सुमारे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पश्चिम घाट परिसरात पुन्हा पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील बटवाडे धबधबा पुन्हा दुधासारखा फेसाळत कोसळू लागला असून सुरक्षेच्या कारणास्तव वन विभागाने पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.

खानापूर तालुक्यातील बटवाडे धबधबा सुमारे ५० फूट उंचीवरून कोसळत असून त्याचे जलवैभव खुलून आले आहे. मात्र, संभाव्य धोका लक्षात घेऊन वन विभागाने धबधब्यांच्या परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद केला आहे.

पश्चिम घाटात सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यातील बहुतांश धबधबे भरून वाहत आहेत. बटवाडे धबधब्यालाही नवसंजीवनी मिळाली असली, तरी मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने निर्बंध लागू केले आहेत.
या निर्णयामुळे नेहमी पर्यटकांनी गजबजलेला बटवाडे धबधबा आणि परिसरातील इतर पर्यटनस्थळे सध्या शांत दिसत आहेत. त्यामुळे पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा प्रत्यक्ष आनंद घेता येत नसल्याचे चित्र दिसून आहे.


Recent Comments