Khanapur

मलप्रभा प्रकल्पातून पाणी उपशाला काँग्रेस नेत्याचा विरोध

Share

मलप्रभा नदीतून पाणी उपसा करण्याच्या आणि इतरत्र वळवण्याच्या विविध प्रकल्पांमुळे खानापूर तालुक्यातील पाण्याच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रस्तावित आणि सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे भविष्यात पिण्याचे पाणी, शेती आणि जलसाठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक काँग्रेस पक्षाने या प्रकल्पांना तीव्र विरोध दर्शवला आहे.

या प्रकल्पांबाबत माहिती देताना काँग्रेस नेते सुरेश जाधव यांनी सांगितले की, पारिशवाड योजनेतून सुमारे २८.४० एमसीएफटी आणि कुसमळी – जांबोटी योजनेतून सुमारे ३० एमसीएफटी पाणी उपसा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय कळसा डायव्हर्शन योजना (१.७२ टीएमसी) आणि भांडुरा नाला डायव्हर्शन योजना (२.१८ टीएमसी) हे विषयही चर्चेत असून, याप्रकरणी न्यायालयात याचिका प्रलंबित आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. काही भागांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. शेतीसाठीही पाण्याचा तुटवडा जाणवत असताना तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा करून इतरत्र नेले जात असल्याने भविष्यातील पाणी सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, अशी भीती सुरेश जाधव यांनी व्यक्त केली.

पंपिंग स्टेशन आणि पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यात मर्यादित प्रमाणातच पाणी उपसा केला जाईल, याची शाश्वती कोण देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकल्पांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली जात आहे.

खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी आणि स्थानिक भाजप नेत्यांनी या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुरेश जाधव यांनी केली आहे. सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून खानापूरच्या पाण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

स्थानिक नागरिकांच्या मते, हा विषय केवळ राजकीय वादाचा नसून खानापूरच्या भविष्यातील पाणी सुरक्षेशी आणि शेतीशी संबंधित आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक घेऊन खरी परिस्थिती जनतेसमोर मांडावी आणि सरकारने अधिकृत माहिती प्रसिद्ध करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. यावर इतर राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: