पतीच्या निधनानंतर एकट्या जीवन जगणाऱ्या महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी कोणीही पुढे न आल्याने टिळकवाडीतील युवकांनी पुढाकार घेत विधीवत अंत्यसंस्कार पार पाडले. या सामाजिक कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

टिळकवाडी येथील रहिवासी शकुंतला रामचंद्र गडकरी या ७० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. पतीच्या निधनानंतर त्या गेल्या काही वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.

महिलेच्या निधनानंतर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातील कोणीही पुढे आले नाही. याची माहिती मिळताच नगरसेवक शंकर पाटील, समाजसेवक गंगाधर पाटील आणि इतर युवकांनी पुढाकार घेत अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत विधीपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात आले.
अडचणीच्या काळात शंकर पाटील, गंगाधर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांनी कौतुक केले. यापूर्वीही त्यांनी अनेक अनाथ व्यक्तींच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पार पाडली असून, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये ते सहभागी होत असल्याची माहिती देण्यात आली.


Recent Comments