नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील काँग्रेस भवनासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला.

नीट परीक्षेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करून केंद्र सरकारने विद्यार्थ्यांवर अन्याय केला होता. मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिल्याने विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.

हा विजय देशातील तरुणांचा आणि सत्याचा विजय असल्याचे सांगत काँग्रेस नेते राजा सलीम काशम्मनवर यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली. तरुण आता भाजपचे वास्तव ओळखून आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
विद्यार्थी आणि तरुणांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष व राहुल गांधी नेहमीच ठामपणे पाठीशी उभे राहतील, असे पक्षाच्या इतर वक्त्यांनी सांगितले.
हा दिवस विद्यार्थी आणि तरुणांच्या संघर्षाच्या विजयाचा असल्याचे सांगत आयेशा सनदी यांनी राहुल गांधींचे आभार मानले. भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी अडिवेश इटगी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments