Belagavi

एसआयआर अर्जासाठी आता केवळ चार दिवसांची मुदत: जिल्हाधिकारी

Share

बेळगाव जिल्ह्यात मतदार यादी मॅपिंग आणि पडताळणी प्रक्रिया सुरू असून, नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून आपली माहिती तपासावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले आहे. बीएलओंशी संपर्क साधून मसुदा अर्ज मिळवण्यासाठी आता केवळ चार दिवसांची मुदत उरली आहे.

पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, २००२ च्या मतदार यादीच्या आधारे नागरिक आपले नाव आणि मतदान केंद्राची माहिती निवडणूक आयोगाच्या वेब पोर्टलवर तपासू शकतात. नाव नसल्यास नातेवाईकांच्या माहितीसह डिजिटल स्वाक्षरी अपलोड करण्याची सोय आहे. परगावी किंवा परदेशात राहणारे नागरिकही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

गेल्या २५ दिवसांत बीएलओंनी जिल्ह्यातील सर्व ४१ लाख ७ हजार मतदारांपर्यंत पोहोचून शंभर टक्के अर्ज वितरीत केले आहेत. बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदारसंघात गेल्या काही वर्षांत योग्य फेररचना न झाल्याने एकाच कुटुंबातील नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर असण्याची समस्या समोर आली आहे.

त्यामुळे नागरिकांनी आपापल्या भागातील बीएलओशी त्वरित संपर्क साधून अर्ज पूर्ण करावा. विहित मुदतीनंतर अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा डुप्लिकेट या श्रेणीत नाव जाणे टाळण्यासाठी ही शेवटची संधी असून, त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Tags: